‘डबल द बस’ अभियानाची सुरूवात,
नागरिकांच्या पुढाकारात सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : शहर बसची संख्या दुप्पट करण्यासाठी पहिल्या टप्प्यात डबल द बस अभियानाची रविवारी सुरूवात करण्यात आली. अनेक जागरूक नागरिक आणि विविध संस्थांचा मंच असलेल्या ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’कडून ‘हवी शुद्ध हवा’ अंतर्गत ही जनचळवळ राबवली जात आहे. यावेळी इको ग्रीन फाऊंडेशन, रोटरी क्लब, औदुंबर फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशनच्या सदस्यांसह उद्योजक, सीए, डॉक्टर, व्यवसायिक आदी मान्यवर उपस्थित होते.
औद्योगिक नगरी, पर्यटन नगरी असलेल्या शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या देखिल तोंड वर काढत आहे. एकीकडे खासगी वाहनांची संख्या वाढत असताना शहर बस नावालाच आहे.
१६ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात आज केवळ १०० शहर बस आहेत. त्यातील फक्त ८० दररोज वापरात असतात. केंद्र सरकारच्या धोरणानुसार १ लाख लोकसंख्येला ६० बस म्हणजे जवळ जवळ १ हजार बस अपेक्षित आहे. तर मनपाची अपेक्षा ५०० बसची आहे. दोन्ही अपेक्षांपासून आपण ५ ते १० पट दूर आहोत. त्यामुळे पहिल्या टप्प्या किमान दुप्पट बस सुरू कराव्यात ही नागरिकांची मागणी आहे. ‘कार फ्री डे’ (२२) निमित्त विभागीय क्रीडा संकुल आणि सेव्हन हिल येथे ‘डबल द बस’ अभियानाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी समन्वयक रूपेश कलंत्री यांनी प्रास्ताविक केले. आकडेवारी मांडत त्यांनी प्रदूषण मुक्ती, वाहतूक कोंडीतून मुक्ती, तणाव मुक्तीसाठी अभियानाची गरज विशद केली. ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी ‘बस पे चर्चा’ उपक्रमाची कल्पना मांडली. सध्याच्या मार्गांची नव्यानं आखणी करण्याची गरज असल्याचही ते म्हणाले. तर संख्या वाढवत असताना बस वापरण्याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे राजेश तात्या पवार यांनी सांगितले. मनिषा चौधरी, आर.एम.मालपाणी यांनीही उपयुक्त सूचना केल्या. अभियानात सहभागासाठी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी पेज’ फॉलो करण्याचे किंवा ९०४९०६७८८८ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करण्याचे आवाहन भुजंग पवार आणि संजय बाजी पाटील यांनी केले आहे.
ऑटोपेक्षा महाग प्रवास :
जागरूक सदस्यांनी शहर बसमध्ये प्रवाशांसोबत चर्चा केली. थांब्यांची अवस्था, वेळापत्रकांची उपलब्धता यावर बोट ठेवले. तर सर्वाधिक तक्रारी तिकीट दराबद्दल होत्या. कमी अंतराचा प्रवास परवडत नसल्याचे एका ज्येष्ठ महिलेने सांगितले. तर चितेगाव -बिडकीन, पंढपूर चौक ते वाळूज साठी ऑटो १० रूपये घेतो. तर स्मार्ट बसचे दर २५ रूपये असल्याची माहिती कर्मचा-यांनी दिली.